कोल्हापूर • प्रतिनिधी
ओमिक्रॉन विषाणूचे वाढते संक्रमण, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, अशा विविध अडथळ्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीकडे लक्ष देता, महाराष्ट्र पदवीधर संघटनेच्यावतीने वृषाली इंगळे – पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अडथळ्यांवर निष्कर्ष काढण्यासाठी शिवाजी विद्यापीठच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले होते.
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयास विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या परीक्षा मार्च २०२१ च्या परीक्षा नियोजनाप्रमाणे शंभर टक्के अभ्यासक्रमावर घेतल्या जाणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यात आली आणि ऑफलाईन शिक्षण पद्धत सुरू झाली. तसेच, चालू सत्रातील परिक्षा ऑफलाईन घेतल्या जातील, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. परंतु राज्यात चाललेला एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठीचे साधन उपलब्ध नाही, समाजकल्याण वस्तीगृह, महाविद्यालय वस्तीगृह अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांची राहायची व्यवस्था नाही, अशा अनेक अडथळ्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, ओमिक्रॉन विषाणू देखील डोके वर काढताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीकडे विशेष लक्ष देऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आणि कोरोना वाढण्यास कारण मिळणार नाही असा निर्णय घेण्याची विनंती महाराष्ट्र पदवीधर संघटनेने केली होती.
महाराष्ट्र पदवीधर संघटनेच्या व विद्यार्थ्याच्या मागणीचा विचार करून कुलगुरूंनी विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्ष्टिकोनातून योग्य निर्णय घेतल्याबद्दल संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वृषाली इंगळे-पाटील, राज्य अध्यक्ष ॲड. सुजितकुमार थिटे व पदाधिकारी यांनी आभार मानले.