कोल्हापूर • प्रतिनिधी
क्रीडापटूंमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडाकौशल्य विकास आणि करिअरच्या संधी व सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात, यासाठी शिवाजी विद्यापीठ सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे विद्यापीठ परिक्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकदिवसीय मेळाव्यामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. धैर्यशील पाटील व संजय जाधव उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठ सक्षमपणे क्रीडापटूंच्या पाठीशी उभे राहिले तर त्यांच्या गुणवत्तेत व यशामध्ये भरीव वाढ होईल, या अपेक्षेतून विद्यापीठाकडून खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्याची भूमिका प्रशासनाची आहे. ॲड. धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत भरीव काम केले आहे. अनेक विधायक सूचना केल्या आहेत. खेळाडूंना क्रीडाप्रकारानुसार आहार, प्रशिक्षण, संसाधने, साधने आदी बाबी उपलब्ध करून ‘मिशन ऑलिंपिक’ हे कायमस्वरुपी लक्ष्य आपल्या क्रीडापटूंसमोर राहावे, या दिशेने विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भातील विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर करण्यास विद्यापीठ सदैव तत्पर आहे.
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, केवळ ऑलिंपिकसाठी म्हणून मुलांना वयाच्या सातव्या वर्षापासून प्रशिक्षित करणाऱ्या चीनसारख्या देशांशी आपली स्पर्धा आहे. त्यांच्याशी स्पर्धा करावयाची तर तशी कार्यप्रणाली, पायाभूत सुविधा आणि तयारी विकसित करावी लागेल. आपल्या मातीतल्या तरुणांत क्रीडाकौशल्ये भरपूर आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची मात्र नितांत आवश्यकता आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठीही असे मेळावे घेऊन त्या सर्वांच्या सूचनांचा एकत्रित बृहतआराखडा आपल्याला तयार करता येऊ शकेल.
यावेळी ॲड. धैर्यशील पाटील, संजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कुलगुरूंसह सर्वच मान्यवरांनी क्रीडापटूंच्या विद्यापीठाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्यांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करण्याबाबत आश्वस्त केले. सुरवातीला क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रीडा संचालक विजय रोकडे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.
मेळाव्यास डॉ. बाबासाहेब उलपे, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ.एन.डी. पाटील, डॉ. एस. एस. चव्हाण, अभिजीत मस्कर, पृथ्वीराज सरनाईक यांच्यासह आफ्रिद मुख्तार आत्तार (जलतरण), ऐश्वर्या राजेंद्र भंडारे (मार्शल आर्ट- कराटे), कुणाल कुमार दरवान (मल्लखांब), केतन भिमगोंडा चिंचणे (मल्लखांब), निशा जितेंद्र मोळके (मल्लखांब), ऋषिकेश संभाजी देसाई (कबड्डी), योगेश शरद पाटील (कबड्डी), सानिका कृष्णा सासणे (बॉक्सिंग), विक्रांत नारायण मलमे (सिकई मार्शल आर्ट), इंद्रजित अशोक फराकटे (ॲथलेटिक्स), श्वेता सातप्पा चिकोडी (ॲथलेटिक्स), भक्ती सुनिल पोळ (ॲथलेटिक्स), अभिषेक कागन्ना देवकते (ॲथलेटिक्स), ऋषिकेश धोंडीराम किरूळकर (ॲथलेटिक्स), उत्तम संभाजी पाटील (ॲथलेटिक्स), शिवानी प्रशांत बागडी (बास्केटबॉल), सिद्धांत सुरेश पुजारी (ॲथलेटिक्स), ताहिर मन्सूर मुल्लाणी (ॲथलेटिक्स), विवेक नारायण मोरे (ॲथलेटिक्स), सत्यजित सुरेश पुजारी (ॲथलेटिक्स) आणि शुभम बाळासाहेब लगड (मल्लखांब) आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विविध पदके प्राप्त करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.