• अजित ठाणेकर यांच्या संकल्पनेतून पेजची निर्मिती
कोल्हापूर • प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद जयंती व युवक दिनाचे औचित्य साधून समिधा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या, रोजगाराची माहिती देणाऱ्या फेसबुक पेजचे अनावरण गुरुवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोशिमाचे माजी अध्यक्ष श्रीकांत पोतनीस होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्येष्ठ श्रीपूजक बाबुराव ठाणेकर यांनी अध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांच्यासह चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक जयंतभाई गोयाणी, क्रिडाईचे संचालक संदीप मिरजकर, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम जोशी, लॉजिंग-बोर्डिंगचे अध्यक्ष विक्रम शेवरे, संदीप देसाई, महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी संघाचे अध्यक्ष सचिन जाधव, आर्य चाणक्य पतसंस्थेचे व्यवस्थापक शिंदे, महालक्ष्मी फेरीवाला संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश उरसाल, हिंदवी ग्रुपचे सुदर्शन सावंत आणि दयावान ग्रुपचे मानसिंग पोवार आदींचे स्वागत केले. त्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अजित ठाणेकर यांनी या पेजची संकल्पना सांगितली. “ज्यांना कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, त्यांनी या पेजवर माहिती प्रसारित करण्याकरिता संपर्क साधावा आणि ज्यांना नोकरीची आवश्यकता असेल त्यांनी पेजवर माहिती घ्यावी” असे आवाहन केले. तसेच याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीकांत पोतनीस यांनी, ” संस्थेचा हा उपक्रम स्तुत्य असून याचा परिणामकारक वापर झाल्यास अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील” असे प्रतिपादन केले.
संदीप मिरजकर यांनी यासोबतच कौशल्य विकासाचे छोटे कार्यक्रम संस्थेने घ्यावेत आणि रिकामा वेळ घालविणाऱ्या युवकांसाठी मोटीव्हेशनल कार्यक्रमही घ्यावेत असे सुचविले. जयंत गोयाणी, श्याम जोशी यांनी उपक्रमास शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कोल्हापूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग व व्यवसाय आहेत. या उद्योगात हेल्परपासून इंजिनिअरपर्यंत, सेल्समनपासून मॅनेजरपर्यंत, डिलिव्हरी बॉयपासून वितरण व्यवस्थापकांपर्यंत कर्मचाऱ्यांची आवश्यकता वेळोवेळी भासत असते. त्या-त्या उद्योगाच्या ठिकाणी ही माहिती लावलेली असते, परंतु ती गरजू युवकांपर्यंत पोहचत नाही व त्यामुळे गरजू आणि नोकरी देणारे दोघेही वंचित रहातात. हे लक्षात आल्यामुळे समिधा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी या दोहोमध्ये दुवा म्हणून काम करण्याच्या संकल्पनेतून हे पेज तयार केले.