रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून रु.९ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली असून, शहराचा विकास शिवसेना करून दाखवेल असे प्रतिपादन त्यांनी या दौऱ्यात केले. यासह तातडीने  रंकाळा तलावाच्या परिपूर्ण विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी रु.९ कोटी ८४ लाखांचा निधी त्यांनी नगरविकास विभागामार्फत मंजूर केला, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, राहुल चव्हाण, राजू हुंबे, ऋतुराज क्षीरसागर, किशोर घाटगे, सुनील जाधव आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
     राजेश क्षीरसागर म्हणाले की, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा पार पडला. या दौऱ्यात वडगाव येथील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर हद्दवाढ कृती समितीची बैठक घडवून आणली. या बैठकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी, हद्दवाढीखेरीज शहराचा विकास खुंटला असून, त्याचे गांभीर्य या बैठकीत आपण व्यक्त केले. याबाबत बोलताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी, हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक असून, कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी यासाठी येत्या दिवाळीनंतर मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याची ग्वाही दिली.  
     नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कै.बळवंतराव अर्जोजीराव यादव (आबा) यांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण नगरपालिका चौक, पेठ वडगांव येथे पार पडले. यानंतर कोल्हापूर शहरातील शाहूकालीन सुबराव गवळी तालीम या संस्थेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन, पायाभरणी समारंभ मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तालीम संस्थेच्या कोनशिलेचे अनावरण शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या हस्ते पार पडले. यानंतर शिवसेनेचे नूतन शहरप्रमुख जयवंत हारुगले यांच्या कोळेकर तिकटी येथील “सिंहगड” शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
      ऐतिहासिक रंकाळा तलावाचे सुशोभिकरण व्हावे, अशी नागरिकांची मागणी असून, रंकाळा तलावाचा विकास करण्याची ग्वाही शिवसेनेने दिली होती. त्यानुसार रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील “रंकाळा परिसर विकसित, जतन व संवर्धन करणे” यासाठी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेंतर्गत रु.१५ कोटी मंजूर करून सदर कामाकरिता पहिला टप्पा म्हणून रु.९ कोटी ८४ लाख इतका निधी आज शासन निर्णयाद्वारे वितरीत करण्यात आला आहे.
     पुढील काळातही शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचा विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रंकाळा तलावास पहिल्या टप्प्यात रु.९ कोटी ८४ लाख निधी मंजूर करण्यास आम्हाला यश आले आहे. पुढच्या काळात महानगरपालिकेची हद्दवाढ, थेट पाईपलाईन, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास, वाहतुकीच्या दृष्टीने रिंग रोड, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, स्काय वॉक आदींची निर्मिती करण्यास प्रयत्नशील असणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.  

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!