नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

Spread the love

• “सिंहगड” शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि.२९) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “सिंहगड” जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि सुबराव गवळी तालीम इमारतीचा भूमिपूजन व पायाभरणी समारंभ होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. 
     नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यातून शहरात भगवे वातावरण निर्माण करण्याची जय्यत तयारी शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शहरात होर्डिंग व स्वागत कमानी लावण्यात आल्या आहे.
     मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी येथे “सिंहगड” शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा तसेच सुबराव गवळी तालीम संस्थेच्या भूमिपूजन व पायाभरणी समारंभाला संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले आदींची प्रमुख उपस्थिती आहे. हा कार्यक्रम दुपारी बारा वाजता होईल.
     नाम. एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर दौऱ्यासाठी सकाळी ११:१५ वाजता  आर.एम.मोहिते हेलिपॅड, मगरायाचीवाडी, वडगाव येथे आगमन व तेथून ते वडगावकडे प्रयाण करतील. पेठ वडगांव येथे कै. बळवंतराव अर्जोजीराव यादव (आबा) यांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर दुपारी १२:०० वाजता सुबराव गवळी तालीम मंडळ या संस्थेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन व पायाभरणी समारंभास उपस्थिती तसेच दुपारी १२:३० वाजता कोळेकर तिकटी येथे “सिंहगड” शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ होईल.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!