विद्युत अपघात टाळण्यासाठी ‘सर्किट ब्रेकर’चे सुरक्षा कवच वापरा: महावितरणचे आवाहन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      घर, दुकान, सोसायट्या व इतर वास्तुमधील अंतर्गत वायरिंग, विविध उपकरणे किंवा लोखंडी साहित्यामधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून प्राणांतिक अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांकडील अंतर्गत वायरिंगमधील करंट लिकेज किंवा योग्य क्षमतेचे सर्कीट ब्रेकर, अर्थिंग नसणे कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. प्राणांतिक विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वास्तुंमध्ये सर्कीट ब्रेकर (‘इएलसीबी’, ‘आरसीसीबी’, ‘एमसीबी’) लावण्यात यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
     गेल्या तीन महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गिझर, कुलर, पाण्याचा नळ, कृषिपंप किंवा पाण्याची मोटार सुरु करताना किंवा विद्युत उपकरणांमुळे विजेचा धक्का बसून प्राणांतिक अपघात झाले आहेत. यामध्ये दोन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. वायरिंग जुनाट होणे व वायरिंगचे इन्सुलेशन निघणे किंवा उंदराने कुरतडल्याने लाईव्ह वायरपासून विद्युत अपघाताचा धोका निर्माण होणे आदी बाबी या अपघातांसाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. योग्य अर्थिंग व सर्कीट ब्रेकर बसविण्याकडे दुर्लक्ष केल्याने सुशिक्षित घरांमध्येही विद्युत अपघात झाल्याचे प्रकार दिसून आले आहे.  
     वीजसंच मांडणीमध्ये विजेचा धोका टाळण्यासाठी योग्य ‘अर्थिंग’ हा पाया व अत्यावश्यक आहे. घरगुती किंवा इतर आस्थापनांमधील अंतर्गत वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास आणि वीजपुरवठा खंडित न होता सुरु राहिल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असते. वीजपुरवठा तत्काळ खंडित होणे आवश्यक आहे. यासाठी घर, सोसायट्या किंवा इतर वास्तुंमध्ये सर्कीट ब्रेकर जसे की अर्थ लिकेज सर्कीट ब्रेकर (इएलसीबी), रेसीड्यूअल करंट सर्कीट ब्रेकर (आरसीसीबी) मिनिएच्यूअर सर्कीट ब्रेकर (एमसीबी’) लावणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणामधील दोषामुळे सर्किट ब्रेकर म्हणजे विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्वाचे सुरक्षा कवच आहे. विविध उपकरणांचा क्षमतेपेक्षा अधिक वीज वापर, इलेक्ट्रीक सर्कीटमध्ये दोष निर्माण होऊन करंट लिकेज होणे, शॉर्टसर्किट होणे, व्होल्टेज वाढणे, अर्थ फॉल्ट होणे आदी प्रकारांपासून होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्कीट ब्रेकरकडून वीजप्रवाह खंडित केला जातो. हा सर्कीट ब्रेकर साधारणतः दोन हजार ते तीन हजार रुपये किंमतीत मिळतो. सर्कीट ब्रेकर सुरक्षा कवच असल्याने ते प्राधान्याने घर, कार्यालय आदी ठिकाणी लावून घेणे गरजेचे आहे.
     विद्युत अपघात टाळण्यासाठी घरगुती, गृहनिर्माण सोसायट्या किंवा इतर आस्थापनांमध्येही सर्वप्रथम केलेले ‘अर्थिंग’ योग्य स्थितीत आहे व त्याची किमान दोन वर्षांनी खात्री करून घेणे अतिशय आवश्यक आहे. सोबतच अर्थिंग नसल्यास ते तत्काळ करणे गरजेचे आहे. नवीन वास्तू बांधताना प्रामुख्याने अर्थिंगसह सर्कीट ब्रेकर लावणे अनिवार्य आहे. मात्र जुन्या वास्तुंमध्ये ते नसल्यास तत्काळ लावणे आवश्यक आहे. परंतु जुन्या वास्तूमध्ये अद्यापही जुन्या प्रकारचे कटआऊट फ्यूज आहेत. त्याऐवजी योग्य क्षमतेचे सर्कीट ब्रेकर लावणे सुरक्षेसाठी गरजेचे आहे. तसेच ओल आलेल्या भिंतीला, टिनपत्र्याला, फ्रीज, टिव्ही, संगणक किंवा पाण्याचे नळ, कुलर आदींना हात लावल्यावर झिणझिण्या येत असतील वायरिंगची तत्काळ तपासणी करावी. ओलसर लोखंडी पाईप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपांला स्पर्श करण्यापूर्वी पायात कोरडी रबरी किंवा प्लास्टिक चप्पल वापरावी. अंतर्गत खराब झालेली वायरिंग तत्काळ बदलून घ्यावी तसेच पुढील धोके टाळण्यासाठी सुरक्षेचे कवच म्हणून सर्किट ब्रेकर वास्तुमध्ये लावण्यात यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!