कोल्हापूर • प्रतिनिधी
कांकायन आयुर्वेद चिकित्सालयाचे संचालक वैद्य दिलखूष मकबूल तांबोळी यांना केरळ येथील वाग्भट सारिणी व हैद्राबाद विद्यापीठाच्या संस्कृत विभागाकडून “भिषक भूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे.
या संस्थानी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्याबद्दल आझादी का सुवर्णमहोत्सव या कल्पनेअंतर्गत भारतातील ७५ वैद्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील वैद्य दिलखूष तांबोळी यांचा समावेश आहे.
वैद्य दिलखूष तांबोळी यांनी गेल्या १५ वर्षात आयुर्वेद प्रचार व प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनार, आयुर्वेद उपचार शिबिरे यांचे आयोजन करून त्यांनी आयुर्वेदाचे विद्यार्थी तसेच सामान्य जनतेला आयुर्वेदाचे महत्व पटवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांचा आयुर्वेदाचा मुख्य ग्रंथ चरकसंहिता या ग्रंथाचा विशेष अभ्यास आहे. तसेच या चरक संहितेचे विद्यार्थीवर्गाला उत्तम आकलन होण्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथे चरक सप्ताहचे आयोजन केले होते. त्यामध्ये भारतातील ३४ वरिष्ठ वैद्यांची व्याख्याने आयोजित केली होती. चरक सप्ताह म्हणजे चरकसंहितेवर संपूर्ण भारतात आयोजन केलेला पहिला उपक्रम होता.
वैद्य दिलखूष तांबोळी यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या हस्ते वैद्य तांबोळी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.