शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात रविवारी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. रस्ता नुतनीकरण आणि सुशोभीकरण कामाचे उद्घाटन यांसह बालसंकुलातील मुलांना फळे वाटप, सीपीआर चौक व गंगावेश येथे भोजन थाळीचे वाटप, नागरिकांना कोव्हिड १९ लसीकरणाचे प्रमाणपत्र वाटप, रक्तदान शिबीर आणि ई- श्रम कार्ड नोंदणी इत्यादी उपक्रम संपन्न झाले.
     गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला आणि शहरातील प्रमुख वर्दळीचा मार्ग असलेल्या पापाची तिकटी ते शहीद भगतसिंग चौक, जुना बुधवार पेठ या रस्त्याचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या रस्त्याच्या कामाकरिता रु.७२ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संपूर्ण रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात येणार आहे. यासह रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टे, सेंटर पट्टे, रिफ्लेक्टर याद्वारे वाहतुक सुरक्षित करण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोगोनल पोल, डेकोरेटिव्ह पोल, ठिकठिकाणी हायमास्ट लॅम्प या विद्युत रोषणाईने रस्त्या उजळणार आहे. 
      याप्रसंगी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. शहरवासियांनी शिवसेनेवर विश्वास दाखवून महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात द्यावी याचपद्धतीने शहरातील सर्व रस्ते तयार करू, असा विश्वास नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
      यावेळी माजी महापौर सौ.सरिता नंदकुमार मोरे, ऋतुराज राजेश क्षीरसागर, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, सौ.ज्योती निलेश हंकारे, इंद्रजीत आडगुळे, अजित राडे, राहुल बंदोडे, ओंकार परमणे, सुशील भांदिगरे, बबनराव गवळी, उदय भोसले, शिवाजीराव चव्हाण, उदय कोळेकर, सम्राट भालकर, महादेव कुकडे, विशाल ससे, बाळासाहेब काळे, सचिन ढणाल, संदीप ढणाल, मुसा पटवेगार, बापू इंगवले, अक्षय कुंभार, पोपटराव मुरगुडे, आनंदराव माजगावकर, पप्पू रजपूत आदी उपस्थित होते.
     शिवसेना मंगळवार पेठ विभागाच्यावतीने शहरप्रमुख जयवंत हारुगले यांच्यामार्फत बालसंकुलातील मुलांना फळे वाटप आणि सीपीआर चौक येथे गरजूंना कोल्हापुरी थाळीचे वाटप करण्यात आले. यासह शिवसेना विभाग उत्तरेश्वर पेठ विभागाच्यावतीने गंगावेश येथे गरजू लोकांना उत्तरेश्वर थाळीचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्यावतीने शहरातील नागरिकांसाठी मोफत कोव्हिड १९ लसीकरणाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
     शिवसेना विभाग यादवनगर येथील न्यू क्रांन्ती तरूण मंडळ यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख अश्विन शेळके आणि युवासेना उपशहरप्रमुख दादू शिंदे यांनी केले होते.
      शिवनेरी विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे ई- श्रमिक कार्ड नोंदणी मोहिमेस नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यामध्ये सुमारे ३५० श्रमिकांनी नोंदणी केली. याचे नियोजन शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रविंद्र माने, राजू काझी, अक्षय खोत, राहुल माळी, सचिन पाटील आदींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!