औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे “व्हायब्रंट महाएक्स्पो” प्रदर्शन शुक्रवारपासून

Spread the love

• देश विदेशातील १०० हुन अधिक कंपन्यांचा सहभाग
कोल्हापूर • प्रतिनिधी
       उद्योग क्षेत्राला चालना मिळावी आणि वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे  “व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२” या प्रदर्शनाचे १५ ते १८ एप्रिल या कालावधीत शाहूपुरी जिमखाना मैदान येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
       या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती आहे.  
       यावेळी ललित गांधी यांनी, व्यापार उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल वापरही अनिवार्य आहे हे प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले जाणार असल्याचे सांगितले.
       प्रदर्शनाचे हे ९ वे वर्ष आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर या धर्तीवरील हे प्रदर्शन असून या प्रदर्शनाचे व्यवस्थापन हे क्रिएटिव्हज एक्झिबिशन अँन्ड इव्हेट व हाऊस ऑफ इव्हेंट या संस्थेने केले आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये देश विदेशातील नामांकित कार्पोरेट कंपन्यांचे स्टॉल्स व त्यांच्या मोठमोठ्या मशिनरी व उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्वच उत्पादनांचे एकूण १०० च्या पासपास कंपन्यांचे स्टॉल्स याठिकाणी असणार आहेत. कोल्हापूरमध्ये प्रथमच जर्मन हँगरमध्ये संपूर्ण वातानुकूलित हे प्रदर्शन होत आहे. स्टार्टपसाठी नवीन उद्योजकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या उद्योजकांना मिळणार आहे.
      या प्रदर्शनासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर एमआयडीसी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशन, कोल्हापूर
इंजिनियरिंग असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकलंगले, डेस्टिनेशन कोल्हापूर यांचे सहकार्य मिळाले आहे. प्रदर्शनाचे गोल्ड स्पॉन्सर हे रिलायन्स पॉलिमर्स व रिमसा क्रेन्स प्रा.लि. हे आहेत.
      चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात दररोज सेमिनारही होणार आहेत. १५ रोजी सरकारी योजनांची माहिती, १६ एप्रिलला आयात निर्यात या क्षेत्रातील संधीची माहिती १७ रोजी आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापार उद्योगातील वापर या विषयावर सायंकाळी ५ वाजता सेमिनार व मार्गदर्शन होणार आहे. नव्या उद्योगांना चालना मिळावी व कोल्हापूरची ओळख सर्व क्षेत्राच्या माध्यमातून व्हावी यासाठीच हे प्रदर्शन नवी चालना व मार्गदर्शन देणारे ठरणार आहे.
       यावेळी संजय पाटील, शिवाजी पोवार, राजू पाटील, जयेश ओसवाल, प्रशांत शिंदे, प्रकाश कणेरकर आदी चेंबरचे पदाधिकारी व हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!