कोल्हापूर • प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ यांच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘शिवाजी युनिव्हर्सिटी रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन’ कंपनी (सेक्शन-८)च्या अध्यक्षपदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची निवड करण्यात आली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक मंगळवारी (दि.५) विद्यापीठ कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये कुलगुरू डॉ. शिर्के यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन नूतन अध्यक्षांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले.
या बैठकीस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख आदी उपस्थित होते.