पाटाकडील, बालगोपाल, फुलेवाडीची विजयी सलामी   

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करून विजयी सलामी देत पुढील फेरीत प्रवेश केला.
     पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी.वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कै.पांडबा जाधव व कै.रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ “सतेज चषक – २०२२” या फुटबॉल स्पर्धेला मंगळवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्या आणि विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती, आमदार जयश्रीताई जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रल्हाद चव्हाण, डॉ.भरत कोटकर, पाटाकडीलचे अध्यक्ष एस.वाय. सरनाईक, फुटबॉल संघाचे अध्यक्ष शरद माळी, फुटबॉल संघाचे कार्याध्यक्ष संपत जाधव व स्पर्धा समिती अध्यक्ष संदीप सरनाईक यांच्यासह बाळासाहेब निचिते, श्रीनिवास जाधव, त्रिवेंद्रम नलवडे, संभाजी मांगोरे-पाटील, प्रमोद बोंडगे, किरण साळोखे, पराग हवालदार, कपील हवालदार, कमलेश शिंदे आदी उपस्थित होते.
             ऋषिकेशची डबल हॅट्ट्रिक…..
     ऋषिकेश मेथे-पाटीलने नोंदवलेल्या डबल हॅट्ट्रिकच्या जोरावर पाटाकडीलने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळवर ८-१ गोलने दणदणीत विजय मिळवला. पूर्वार्धात ओमकार पाटीलने ७व्या मिनिटास गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर उत्तरार्धात ऋषिकेश मेथे-पाटीलने ४४, ४७, ५८, ६५, ७६, ८१व्या मिनिटास गोल नोंदवून स्पर्धेत पहिली डबल हॅट्ट्रिक करण्याचा मान मिळवला. दरम्यान ५४व्या मिनिटास प्रथमेश हेरेकरने गोल केला. उत्तरेश्वरकडून आदित्य साळोखे याने ७७व्या मिनिटास एकमेव गोल करून आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेश्वरचा गोलरक्षक अनिकेत वरेकर याने पाटाकडीलच्या अनेक चढाया व जोरदार फटके परतावून लावल्याने मोठ्या गोलफरक्याने होणारा पराभव टळला.
     बालगोपालची पिछाडीवरून आघाडी…..
      बालगोपाल आणि ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. पूर्वार्धात पिछाडीवर पडलेल्या बालगोपालने उत्तरार्धात जोरदार खेळ करून सामन्यात ३-२ने विजय संपादन केला.
      पूर्वार्धात ऋणमुक्तेश्वरकडून आकाश मोरेने १४व्या मिनिटास गोल केला पण ही आघाडी फारकाळ टिकली नाही. १५व्या मिनिटास अभिनव साळोखेने गोल नोंदवून बालगोपालला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ३१व्या मिनिटास पुन्हा प्रकाश संकपाळने ऋणमुक्तेश्वरला २-१ची आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात मात्र बालगोपालने गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार खेळ करून खोलवर चढाया रचल्या. त्यामध्ये रोहित कुरणेने ४५व्या मिनिटास बरोबरी साधणारा गोल केला. लगेचच ४८व्या मिनिटास पुन्हा रोहितने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून संघाची आघाडी वाढवली. अखेर उर्वरित वेळेत ३-२ गोलची आघाडी कायम राखत बालगोपालने विजयावर शिक्कामोर्तब केले.
             फुलेवाडी टायब्रेकरवर विजयी…..
     सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात फुलेवाडीने बीजीएम स्पोर्टसला टायब्रेकरवर पराभूत केले.
      सामना सुरू होताच पहिल्याच मिनिटात बीजीएमच्या ओमकार जाधवने गोल नोंदवून फुलेवाडीला जोरदार धक्का दिला. त्यानंतर उत्तरार्धात चंदन गवळी याने ६४व्या मिनिटास गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला.
       पूर्णवेळेत सामना बरोबरीत सुटल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. बीजीएमकडून श्रेयस मोरेचा पहिलाच फटका बाहेर गेला आणि फुलेवाडीस विजयाचा मार्ग सापडला. फुलेवाडीच्या अक्षय मंडलिकने अचूक फटक्याद्वारे गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बीजीएमच्या निरंजन कामते, वैभव राऊत, सिध्देश साळोखे, सचिन गायकवाड यांनी गोल केले. परंतु पहिल्या फटक्यात मिळालेल्या आघाडीचा फायदा उठवत फुलेवाडीच्या तेजस जाधव, अरबाज पेंढारी, ऋतुराज संकपाळ व रोहित मंडलिकने अचूक गोल नोंदविले आणि ५ विरुध्द ४ गोलने विजय साकारला.
                         बुधवारचे सामने…..
• जुना बुधवार – सम्राटनगर : दुपारी २ वा.
• खंडोबा – प्रॅक्टीस : दुपारी ४ वाजता. 
——————————————————- ReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!