सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प’ उभारण्यासाठी गावांनी पुढाकार घ्यावा: पालकमंत्री

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     वाढती लोकसंख्या आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, ही गावपातळीवर एक मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे ‘सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प’ उभारण्यासाठी गावांनी पुढाकार घ्यावा. ही योजना मंजूर असलेल्या गावांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे  प्रकल्प आराखडा तात्काळ सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
     पंचगंगा प्रदूषण नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवी आंधळे, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
     महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ग्रामपंचायतींना सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी दिड कोटी रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज स्वरुपात निधी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ गावांमधे हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गावा-गावांमध्ये वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा विचार करुन गावांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. बऱ्याचदा सांडपाण्यामुळे रोगराई, आजार निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी आपल्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. ज्या ग्रामपंचायतींना प्रकल्प आराखड्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी मंजूर आहे, त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तात्काळ प्रकल्प आराखडा सादर करावा व हा प्रकल्प राबवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 
     उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणाऱ्या गावांच्या सद्यस्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी ग्रामपंचायतींना दहा वर्षाच्या मुदतीने बिनव्याजी दीड कोटी रुपयांपर्यंतचा निधी पुरविण्यात येणार आहे. गांधीनगर, गडमुडशिंगी आणि वळीवडे या तिन्ही गावामध्ये एक एसटीपी प्रकल्प तर उंचगावमध्ये स्वतंत्र तसेच कळंबा आणि पाचगाव या गावांसाठी एक एसटीपी प्रकल्प त्याचबरोबर चंदुर आणि कबनूर या दोन्ही गावासाठी एक एसटीपी आणि तळदगे गावात स्वतंत्र एसटीपी उभारण्याचे नियोजित असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.
     बैठकीत सर्व गावांनी स्वतंत्र आराखडे तयार करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली. याशिवाय तारदाळ, खोतवाडी, यद्राव आणि कोरोची ही चार गावेदेखील नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहेत.
     बैठकीला करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार यांच्यासह संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, गटविकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!