कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्द योजना

Spread the love


        
• ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा पुढाकार
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोना जागतिक  महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला आहे.
      महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना (उमेद) च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाचे तसेच सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती होण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून विविध योजनांमध्ये कृतीसंगमाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
     जिल्हास्तरावरून गावनिहाय माहिती प्राप्त करून एकट्या पडलेल्या विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समूहामध्ये प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार विशेष बाब म्हणून किमान पाच विधवा महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात येणार असून त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या समूहातील सदस्यांना फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधीही अदा करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
     महिलांना पीएमएसबीवाय व पीएमएसबीवाय योजनेचे ३४२ रुपये निधी भरण्यास बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या महिलांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ देण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.
      उमेदमार्फत विधवा महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संघीही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील १८ ते ३५ वयोगटातील युवक – युवतींना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य देण्यात येणार आहे. आरसेटी योजने अंतर्गत १८ ते ४५ या वयोगटातील युवक-युवतींना १० ते ४५ दिवसांचे कृषीविषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!