कोल्हापूर • (जिमाका)
नवभारत घडविण्यासाठी मतदारांसह, नवमतदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात १२व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे व करवीर तहसिलदार श्रीमती शितल मुळे-भामरे व्यासपीठावर उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले, मतदान करणे हा केवळ मतदारांचा उत्सव नाही तर राज्यघटनेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकांचा पर्यायाने लोकशाहीचा महोत्सव आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदारांनो उत्स्फूर्त व सद्सदविवेक बुध्दीने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी, गेल्या वर्षी सुमारे ८८ हजार १०६ नवमतदारांनी नोंदणी केली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. कांबळे यांनी प्रास्ताविकात दिली. राष्ट्रीय मतदान दिनाच्या अनुषंगाने यावेळी उपस्थित सर्व नवमतदारांना सामुहिक शपथ देण्यात आली. याप्रसंगी डॉ. आझाद नायकवडी यांनी मतदान करण्याविषयी प्रबोधनात्मक पोवाडा सादर केला.
या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून दिव्यांग मतदार व तृतीयपंथी मतदारांना इपिक कार्ड देणे, निबंध स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तसेच उत्कृष्ट पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना श्री. जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदीप पाटील तर आभार प्रदर्शन शितल मुळे-भामरे यांनी केले.