प्रभाग आरक्षण निश्चित ; इच्छूक लागले तयारीला

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       कोल्हापूर महापालिकेच्या  निवडणुकीसाठी  सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभागासाठी आरक्षण निश्चित झाल्याने इच्छूक उमेदवार तयारीला लागले आहेत. अपेक्षित असलेले आरक्षण पडल्याने अनेकांनी प्रभागात आजच फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. खऱ्या अर्थाने आता ८१ प्रभागात रणधुमाळीला सुरूवात होईल.
       आरक्षण सोडतकडे इच्छुकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. इच्छूक असलेल्या काही उमेदवारांना अपेक्षित असलेले आरक्षण पडल्याने त्यांना लॉटरी लागली तर काही जणांची मैदानात  उतरण्यापूर्वीच दांडी उडाली आहे. तसेच काही इच्छूक उमेदवार आपल्या शेजारच्या प्रभागात नशीब आजमावून पाहण्याच्या तयारीत आहेत.
       महापालिकेच्या ८१ प्रभागासाठी मार्चअखेरीस किंवा एप्रिल महिन्यात  पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ८१ प्रभागापैकी अनुसुचित जाती प्रभाग ११ असून त्यापैकी ६ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. ओबीसी प्रभाग २२ असून त्यापैकी ११ प्रभाग महिलांसाठी राखीव तर खुले प्रभाग ४८ असून त्यापैकी २४ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत.
      महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, ताराराणी आघाडीसह अनेक पक्ष व संघटना तसेच अपक्ष उमेदवार तयारीला लागले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. आरक्षण सोडतीवर अनेकांचे भवितव्य अवलंबून होते.  आता आरक्षण सोडत निघाल्याने राजकीय पक्ष , संघटना तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले मोर्चेबांधणीच्या तयारीला लागतील.
     ‘ ते ‘ झळकले सोशल मीडियावर
     महापालिका निवडणुकीसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. त्यापैकी काही इच्छूक उमेदवारांना अपेक्षित असलेली आरक्षणाची लॉटरी लागली आहे. त्यांनी प्रभागात फटाक्यांची आतिषबाजी करून निवडणुकीतील आपला निर्धार पक्का केला आहे. अशा इच्छूक उमेदवारांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘ त्या ‘ उमेदवारांना शुभेच्छा देऊन भावी नगरसेवक असा उल्लेख केला आहे. सोमवारी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर सोशल मीडियावर असे अनेक इच्छूक झळकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!