शहरवासियांचा घरफाळा व इतर कर पूर्णपणे माफ करा: भाजपाचे निवेदन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     आर्थिक संकटात असलेल्या शहरवासियांचा घरफाळा, व्यवसाय कर, पाणी बिल व इतर कर पूर्णपणे माफ करा, अशा मागणीचे निवेदन भाजपातर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.
     कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वत्र आणीबाणी निर्माण झाली आहे. सामान्य जनता, प्रशासन, सरकार याविरुद्ध लढाई देत आहेत. याप्रसंगात माणसाचे जीव वाचविण्यासाठी सर्व यंत्रणा व सेवाभावी संस्था आर्थिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या मदत करून समाजाला उभे करण्यासाठी झटत आहेत. कोल्हापूर जिल्हा विशेष करून शहर परिसरात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची झालेली आहे. या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने कोरोना प्रतिबंध उपाय म्हणून जिल्हा व शहर परिसरात लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जनजीवन व अर्थचक्र कोलमडून पडले आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे कोल्हापूर शहरातील सर्व व्यवसाय, उद्योग, व्यापार, रोजगार बंद झाले आहेत. या परिस्थितीमुळे आम जनतेपुढे आजार, कामबंद, बँकेचे हप्ते, शैक्षणिक खर्च, जागेचे भाडे यामुळे प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा व शहर हे कोरोना रेडझोनमध्ये आल्याने येथील व्यापार व अर्थचक्र पूर्णपणे थांबणार हे निश्चित झाले आहे.  या आर्थिक संकटाच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिकदृष्ट्या भार हलका करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्र.का.सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, उपाध्यक्ष संतोष भिवटे यांच्यावतीने महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले.
      या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की, कोल्हापूर महानगरपालिका यांनी कोरोना व लॉकडाऊन परिस्थितीमुळे निर्माण अर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने एप्रिल, मे, जून, जुलै २०२१ या महिन्यातील चालू आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये महसुली कर अंतर्गत येणारा घरफाळा, पाणीबील, व्यवसाय कर, फायर परवाना कर व इतर कर संपूर्णपणे व सरसकट माफ करून आर्थिक संकटात सापडलेल्या कोल्हापूर शहरवासिय व्यापारी, उद्योजक व आम जनतेला दिलासा द्यावा.
            तर भाजपचे जनआंदोलन…..
     सदर निवेदनाद्वारे भाजपा कोल्हापूरच्यावतीने याबाबत लेखी मागणी करून सकारात्मक उपाययोजना कराव्यात असे महापालिका प्रशासकांना कळविले आहे. याबाबत विलंब किंवा टाळाटाळ झाल्यास सदर विषयाबाबत भाजपा प्रसंगी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!