आंबेओहळचे पाणी पाहून कृतार्थ झालो: मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     आंबेओहळ प्रकल्पातून सोडलेले पहिलेच पाणी पाहून कृतार्थ झालो, अशी भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. आंबेओहळ प्रकल्पातून पहिलेच पाणी सोडण्याचा कार्यक्रम मंत्री श्री. मुश्रीफ व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हस्ते झाला. स्व. बाबासाहेब कुपेकर उत्तुर विभागासह, गडहिंग्लज विभागातील शेतकऱ्यांनी २२ वर्षापूर्वी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न आज साकार झाल्याचा मोठा आनंद आहे, असेही ते म्हणाले.
       मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, सव्वा टीएमसी साठवण क्षमतेचा आंबेओहोळ प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. त्यापैकी एक थेंबही पाण्याचा वापर झालेला नाही. या प्रकल्पाच्या पाण्यावर वैयक्तिक, शेतकरी मंडळाच्या आणि सहकारी संस्थांच्या सामुदायिक अशा प्रकारच्या पाणी योजना तयार करा. या योजनांसाठी लागेल ते आर्थिक सहकार्य सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व केडीसीसी बॅंकेच्या माध्यमातून करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
       प्रकल्पग्रस्तांच्या शिल्लक राहिलेल्या पुनर्वसनाच्या समस्या सोडवण्यासाठी गावनिहाय याद्या करा व नियोजनबद्धरीत्या शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पुनरुच्चारही मंत्री मुश्रीफ यांनी केला.    
       मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, हा विभाग कागल विधानसभा मतदारसंघ जोडल्यानंतर येथील विदारक परिस्थिती मला दिसत होती. माता-भगिनी व लहान मुले-बाळे ढकल गाडीने, डोकीने पाणी वाहून पिण्याच्या पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी संघर्ष करीत होते. एकाच मतदार संघातील विकासाचा काळजाला चटका लावणारा हा असमतोल मला अस्वस्थ करायचा. त्याचवेळी हा असमतोल नाहीसा करण्याचा मी चंग बांधला व आंबेओहळ या प्रकल्पाच्या पूर्ततेची शपथ घेतली. अर्थात; प्रकल्पग्रस्तांच्या त्यागामुळेच जनतेच्या हाल-अपेष्टा संपुष्टात आल्या, असेही ते म्हणाले.
      माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, आंबेओहळच्या पाण्यामुळे उत्तुर विभागासह गडहिंग्लज विभागातील २५ गावांच्या शिवारात हरितक्रांती येणार आहे. हिरवाईने नटण्यासाठी हा शिवार आसुसलेला आहे.
      स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात पाटबंधारे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे म्हणाले, आजचा सुवर्णदिन ऐतिहासिक असणार आहे. आंबेओहोळ प्रकल्पाचा एकूण २५ गावांना लाभ होणार आहे. ज्या प्रकल्पपूर्तीची ३५ हजार नागरिक वाट बघत होते, तो प्रकल्प पूर्ण होऊन आज पहिले पाणी सोडण्यात आले. ३५ हजार नागरिक या दिवसाची वाट पाहत होते. प्रत्येक शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर करावा. एकूण सात बंधारे असून सहा पूर्ण झालेत व राहिलेला एक जूनपर्यंत पूर्ण करणार. एकूण १७ हजार एकर साठी पाणी पुरेसे आहे.
      यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, केडीसीसी संचालक सुधीर देसाई , मुकुंददादा देसाई, विष्णूपंत केसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, आजरा साखर संचालक मारुतीराव घोरपडे, दिपक देसाई, विजय वांगणेकर, महादेव पाटील, डॉ.प्रकाश तौकरी आदी प्रमुख उपस्थित होते. संजय बी. पाटील – किणीकर यांनी आभार मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!