कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूरच्या गुरूप्रसाद मोरे या शाळकरी मुलाने सिंधुदुर्ग समुद्रात बुधवारी रात्री आणि गुरूवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पोहण्याचा थरार केला. सलग १९ तास २३ मिनिटात न थांबता पोहून त्याने सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे ९७ कि.मी.चे अंतर पार केले. त्याच्या या विक्रमाची नोंद परफेक्ट बुक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली आहे. अवघ्या १३ व्या वर्षी विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या गुरुप्रसाद मोरेच्या “ऑलम्पिक पदकाच्या” ध्येयास सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणारे हे दोन्ही किल्ले पोहून सर करणाऱ्या गुरुप्रसाद मोरेचा रविवारी शिवसेना शहर कार्याल येथे राजेश क्षीरसागर यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कामगिरीबद्दल राजेश क्षीरसागर यांनी रु.११ हजारांचे बक्षीसही गुरुप्रसाद मोरे याला दिले.
यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, गुरुप्रसाद मोरे याने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना, कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल अभिमान असल्याचे म्हटले. यासह पुढील काळात गुरुप्रसादने जिद्दीने, एकाग्रतेने ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी तयारी सुरु करावी. त्यादृष्टीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, याकरिता सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही यावेळी दिली.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर यांच्यासह सुनील जाधव, विभागप्रमुख निलेश गायकवाड, बबनराव गवळी, उदय पाटील, कपिल केसरकर, बंडा माने, गुरुप्रसादचे प्रशिक्षक निळकंठ आखाडे, वडील विनोद मोरे, आई सौ.छाया मोरे आदी उपस्थित होते.
——————————————————-