कोल्हापूर • प्रतिनिधी
मराठा समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. मुश्रीफ यांची सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने प्रताप उर्फ भैय्या माने, नितीन काळबर आणि नितीन दिंडे यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.
मराठा समाजाला घटनात्मकरित्या टिकणारे आरक्षण द्या, त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी करावी. सारथीवर कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या संस्थेची जिल्हानिहाय विस्तारवाढ व दरवर्षी दोन हजार कोटी रुपये निधी द्यावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जमर्यादा वैयक्तिक २५ लाख व सामूहिक ५० लाख करा. दरवर्षी पाच हजार कोटींची तरतूद व व्याज परतावा नियमित मिळावा. मराठा आरक्षणातून नियुक्त झालेल्या २,७६० उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात. नोकरी व शिक्षणामध्ये मराठ्यांना ओबीसी प्रमाणेच सुविधा द्या. अशाप्रकारचे मुद्दे मांडले.
यावेळी नितीन दिंडे, विशाल पाटील, प्रकाश जाधव, नितीन काळबर, आनंदा पसारे, नानासो बरकाळे, विक्रम चव्हाण, सचिन मोकाशी, महेश मगर, दिपक मगर, शशिकांत भालबर, अमित पाटील, संग्राम लाड, अविनाश जाधव, सचिन निंबाळकर, दिग्विजय डुबल, प्रशांत म्हातुगडे, जितेंद्र सावंत, अजित साळुंखे, तुषार कोकाटे, अखिलेश भालबर, धीरज मोहिरे, रोहन गजबर, जीवन खेबुडे, अक्षय भोसले, अभिजीत भोसले, महेश शेडबाळे, अरविंद लाड, विजय वाडकर, शुभम घाडगे आदी उपस्थित होते.