•कोल्हापूर विमानतळाच्या जमीन संपादनाचे काम पूर्णत्वाकडे
कोल्हापूर • प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कार्यरत असलेले व प्रस्तावित अशा विविध विमानतळांच्या विकासासंबंधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करून पुढील धोरण ठरवण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे कार्यकारी संचालक दीपक कपूर यांनी दिली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे कार्यकारी संचालक दीपक कपूर यांची आज भेट घेऊन त्यांना चेंबरच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीच्या अभ्यास गटाचा प्रस्ताव सादर केला, त्याप्रसंगी दीपक कपूर बोलत होते.
चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यावेळी सांगितले की, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, सोलापूर, शिर्डी, अमरावती या विमानतळांच्या विकासासंबंधी प्रलंबित असलेल्या कामाबद्दल चर्चा केली. तसेच औरंगाबाद, नागपूर, पुणे या अन्य विमानतळांच्या संबंधी चेंबरने सादर केलेल्या अहवालावर चर्चा केली.
कोल्हापूर विमानतळसंबंधी चर्चा करताना ललित गांधी यांनी विमानतळ विस्तारीकरणाचे काम तसेच धावपट्टी, नाईट लँडिंग ही सुविधा व विमान सेवांचा विस्तार यासंबंधीचे विषय मांडले. कोल्हापूर विमानतळाच्या भूमी संपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या तीन महिन्यात यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील व धावपट्टी विस्तारीकरणासह अन्य सर्व सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित केल्या जातील अशी ग्वाही दीपक कपूर यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी झालेल्या चर्चेत चेंबरच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य समीर दुधगावकर, संदीप भंडारी, चेंबरचे सेक्रेटरी जनरल सागर नागरे यांनीही सहभाग घेतला.