कोल्हापूर • प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात एजंटगिरी खपवून घेणार नसल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कोल्हापूर विभागाची आज प्राथमिक बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले की, आजची बैठक प्राथमिक स्वरुपाची असून, पुढील काळात राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी ६ विभागीय बैठका आयोजीत केल्या जाणार आहेत. मराठा समाजातील युवकांना सक्षम करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती घेवून अहवाल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे सादर करणार आहे. कारण हे फक्त घोषणा करणार सरकार नसून, त्या पूर्ण करणार सरकार आहे. त्यामुळे पुढील काळात महामंडळाच्या सुटसुटीत कारभाराकडे आपला कल असेल. मराठा समाजातील युवा उद्योजकांना कर्ज पुरवठा करून उद्योजकांना सक्षम करण्याचे उद्देश असून, यामध्ये कोणतीही एजंटगिरी खपवून घेतली जाणार नाही किंवा कोणी टक्केवारीने मराठा युवकांच्या हक्काचे पैसे लाटत असेल तर त्याची आपल्याशी गाठ असल्याचा इशारा त्यांनी देत योजने संदर्भात सविस्तर माहिती देवून, आजपर्यंत जिल्ह्यातील किती लोकांनी अर्ज केले आणि त्याची सद्यस्थिती काय आहे अशी विचारणा केली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे यांनी माहिती देताना, महामंडळाचे काम ३ योजनेत होत असून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत रु.१० लाखाच्या मर्यादेत कर्ज, गट कर्ज व्याज परतावा योजनेत दोन व्यक्तींसाठी रु.२५ लाख, तीन व्यक्तींसाठी रु.३५ लाख, चार व्यक्तींसाठी रु.४५ लाख व पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्तींसाठी रु.५० लाख मर्यादेत कर्ज, गट प्रकल्प योजना ही शेतकरी उत्पादकांसाठी असून पात्र असणारे पाच शेतकरी एकत्र येवून केलेल्या गटास रु.१० लाखपर्यंत बिनव्याजी कर्जरक्कम शेतीपूरक उद्योगासाठी देण्यात येत असल्याची माहिती दिली. यासह वैयक्तिक योजनेसाठी सुमारे ६००० अर्ज आले त्यातील २५३४ लाभार्थ्यांना रु.११ कोटी इतक्या रक्कमेचे कर्ज वाटप झाले असून त्यातील २२३६ लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरु आहे. गट कर्ज योजनेत ४१ अर्ज आले त्यातील १४ गटाना रु.३ कोटी कर्ज रक्कमेचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती दिली. मराठा उद्योजक युवकांनी अधिक माहितीसाठी शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केले. यावेळी कौशल्य विकास रोजगारचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने, महामंडळाचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे, जिल्हा समन्वयक सतीश माने, जिल्हा समन्वयक पुष्पक पालव शिवसेनेचे किशोर घाटगे उपस्थित होते. ———————————————– Attachments areaReplyForward