• पोटनिवडणुकीसह महापालिका व जि.प. निवडणुकीची चर्चा
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेवू, अशी ग्वाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आगामी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसह, महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून १९९० पासून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. दोनवेळा अपवाद वगळता शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर डौलाने फडकत आहे. परंतु, भाजपची गद्दारी, गेल्या काही काळात दोन्ही कॉंग्रेसने शिवसेनेबाबत केलेला दुजाभाव आणि पारंपरिक मतदारसंघ यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क असून, हा बालेकिल्ला परत ताब्यात घेण्यासाठी शिवसैनिक “मातोश्री”च्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच निवडणुका, महापालिका निवडणूक आणि खासकरून कोल्हापूर “उत्तर”ची पोटनिवडणूक मैत्रीपूर्ण म्हणून लढविण्याबाबत पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश द्यावेत, अशी एकमुखी मागणी शिवसेना आजी – माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी शिवसेना शहर कार्यालयास भेट देवून संवाद साधला. या बैठकीस मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आम. चंद्रदीप नरके, माजी आम. सत्यजित पाटील उपस्थित होते.
यावेळी सर्वच आजी – माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, कोल्हापूर शहरात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री शिवसेनेचे असल्यामुळे शहरासाठी गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणणे शक्य झाले आहे. पर्यटन खात्यानेही शहरासाठी निधी देवून पाठबळ दिले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दहा पैकी सहा जागी विजय मिळविता आला. परंतु, २०१९ च्या निवडणुकीत पाच उमेदवारांच्या पराभवासाठी भाजपची गद्दारी कारणीभूत ठरली आहे. भाजपचा अहंकार तोडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी महाविकास आघाडीची निर्मिती करून राज्यात शिवसेनेची सत्ता आणली. याचे सर्वच शिवसैनिकांनी मनापासून स्वागत केले. पण, आताच्या घडीला कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे. गोकुळच्या निवडणुकीत शिवसेनेचा वापर करून घेण्यात आला आणि सत्ता काबीज केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आदेश डावलण्यात आले. ज्या भाजपशी शिवसेनेने युती तोडली त्याच भाजप आणि मित्रपक्षांना उर्जितावस्था देण्यासाठी जिल्हा बँकेत शिवसेनेला डावलून भाजपशी युती करण्यात आली. पण, शिवसेनेनेही ज्या – त्या वेळी आपली ताकत दोन्ही पक्षांना दाखवून दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.
यासह कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली तर भविष्यात शिवसेनेच्या बालेकिल्यावरील हक्क संपुष्ठात येवून अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर “उत्तर” ची पोटनिवडणुक लढण्यास शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश द्यावेत, अशी सर्वांची भावना असून या भावना शिवसेना पक्षप्रमुखांपर्यंत पोहचवाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली.
——————————————————-