डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचा स्वागत समारंभ उत्साहात

Spread the love


• २० विद्यार्थ्याना सौ. शांतादेवी पाटील शैक्षणिक शिष्यवृत्ती- कुलपतींची घोषणा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ हे अल्पावधीतच शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात देशातील अग्रगण्य विद्यापीठ बनेल, असा विश्वास विद्यापीठचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात डॉ. पाटील बोलत होते. यावेळी ‘सौ. शांतादेवी डी. पाटील शिष्यवृत्ती योजना’ जाहीर करत  २० विद्यार्थ्यांना चारही वर्षांची संपूर्ण फी माफ करण्याची घोषणा डॉ. पाटील यांनी केली.
       हॉटेल सयाजी येथे झालेल्या या कार्यक्रमास डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रकेशकुमार मुदगल, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, अजितराव पाटील – बेनाडीकर, तळसंदे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
      डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून १७२ शिक्षण संस्था आज कार्यरत असून ३ लाख २५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण होऊन गेले आहेत. याचा खूप अभिमान वाटतो. आपण वयाच्या विसाव्या वर्षी तळसंदे येथे १४८ शेतकऱ्यांची २०५ एकर शेती विकत घेतली.  फोंडया माळावर शेती विकसित केली. त्यानंतर या माळरानावर कृषी महाविद्यालय सुरू केले. पहिल्या बॅचला फक्त ४९ विद्यार्थी होते. आता ४५०० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
       महाराष्ट्रातील पहिले खासगी कृषी विद्यापीठ म्हणून तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला मान्यता मिळाली. येत्या तीन-चार वर्षांत हे विद्यापीठ चांगले नावारूपाला येईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. नॅकचे ‘ए’ मानांकन आणि मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. देशभरात कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रात जे जे चांगले अभ्यासक्रम आहेत ते येथे सुरु करण्याचा प्रयत्न राहील. येत्या दहा वर्षात या कॅम्पसमध्ये किमान दहा हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे असे नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. संजय डी पाटील यांनी सांगितले.
         नोकरी देणारे विद्यार्थी घडवणार: डॉ. प्रथापन
     विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणाची माहिती देताना नोकरी मिळवण्यासठी पत्र नव्हे तर नोकरी देण्यासाठी सक्षम विद्यार्थी  या विद्यापीठातून घडतील असा विश्वास दिला. इस्राइल, नेदरलँड, युएईमधील विद्यापीठांशी तसेच देशातील मोठ्या शैक्षणिक व औद्योगिक संस्थंशी विद्यापीठाने सामंजस्य करार केला असल्याचे सांगितले.
           व्यक्तिमत्व विकासावर भर: डॉ. गुप्ता
     कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी देश उभारणीच्या कामात हे विद्यापीठ नक्कीच योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला. व्यक्तिमत्व विकासासाठी १० क्लब सुरु केले असून अभ्यासक्रम व्यतिरिक्त विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगितले. आमदार ऋतुराज पाटील हे स्पोर्ट्ससाठी विशेष उपक्रम राबविणार असून दोन वर्षात उत्तम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
     असोसिएट डीन डॉ. संग्राम पाटील यांनी विद्यापीठात सुरु केलेल्या अभ्यासक्रमाच्या रचनेबाबत माहिती दिली. शिक्षण व उद्योग जगतातील अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम तयार केल्याचे सांगितले. व्हीआयटी वेल्लोर येथे कार्यरत सुमारे ३० वर्षे कार्यरत असलेले डॉ मुरली मनोहर भूपती हे तळसंदे विद्यापीठात कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाचे डीन म्हणून लवकरच रुजू होत आहेत. त्यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
   यावेळी सीएचआरओ श्रीलेखा साटम, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव व सुरेश खोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ए. एन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य शेलार, प्राचार्य डॉ. महादेव नरके, फार्म इन्चार्ज ए. बी. गाताडे, डॉ. एल. व्ही. मालदे, इंजि. पी. डी. उके, डॉ. आर. एस. पाटील, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली पाटील, अजित पाटील विद्यापीठ पीआरओ शैलेश कपूर यांच्यासह विविध संस्थाचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुलिका भूमकर व प्रा. अक्षता पाटील यांनी केले. 
                             ………………
            सौ. शांतादेवी डी. पाटील शिष्यवृत्ती जाहीर…..
      खासगी क्षेत्रातील या पहिल्याच कृषी व तंत्र विद्यापीठात प्रवेश घेऊन डी. वाय. पाटील ग्रुपवर विश्वास दाखवणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांचे डॉ. संजय डी. पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळी या विद्यापीठासाठी ‘सौ. शांतादेवी डी. पाटील शिष्यवृत्ती योजने’ची घोषणा त्यांनी केली.  विविध शाखामध्ये प्रथम प्रवेश घेणारे १० विद्यार्थी व सर्वाधिक गुण असणारे १० विद्यार्थी अशा एकूण २० जणांना चारही वर्षाची फी माफ करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही योजना दरवर्षी लागू असेल असेही त्यांनी सांगितले. प्रथम प्रवेश घेणारे ओमकार मोरे, राजवर्धन तोडकर, आदित्य राठोड, गणेश जठार, प्रतिक खोत, प्रतिक जाधव, राजवर्धन सकपाळ, वैष्णवी पवार, गौतमी जोशी, अपूर्वा माळवे तर सर्वाधिक गुण मिळवणारे स्वस्तिक भोसले, अभिजित पाटील, संकेत कुरणे,अवधूत केसरकर, साक्षी पाटील, कोमल निकम, जयदीप बनकर, निरंजन पाटील, लीन्जा गनवाणी, सिद्धी करडे यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!