शालिनी स्टुडिओ संदर्भात हेरिटेज कमिटी गप्प का? – अध्यक्षांनी खुलासा करावा

Spread the love

• कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     जागतिक चित्रपटसृष्टीत सिंहाचा वाटा असणाऱ्या कोल्हापुरातील हेरिटेज वास्तूंपैकी नावाजलेल्या शालिनी स्टुडिओचे बांधकाम व्यावसायिकांकडून अस्तित्व संपवून अंत होत असताना ज्या कारणासाठी म्हणजेच ऐतिहासिक वास्तू वारसास्थळांच्या संवर्धन आणि जपणुकीसाठी शासनाने नेमलेल्या कोल्हापूर हेरिटेज समितीने हा स्टुडिओ वाचविण्यासाठी आपली नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्यक्षात काय प्रयत्न केले, याचा जाहीर खुलासा करावा अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितिच्यावतीने करण्यात आली आहे.
      या संदर्भात कृती समितीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९ च्या संरक्षित वास्तूच्या म्हणजेच हेरिटेज यादीत असणारा हा ऐतिहासिक शालिनी स्टुडिओ अचानक या यादीतून गायब कसा झाला याचे गौडबंगाल काय आहे ?  कोल्हापूरच्या वारसास्थळातील शताब्दी वर्ष पूर्णत्वाकडे असणारा हा स्टुडिओ त्याचे अस्तित्व संपवून बिल्डरलॉबीच्या ताब्यात जाण्यास या अस्तित्वात असणाऱ्या कोल्हापूरच्या हेरिटेज समितीचे योगदान आहे की काय अशी आम्हां कोल्हापूरकरांना शंका येत आहे. एरवी कोल्हापूरच्या विकासकामात पुरातन वस्तूंच्या संवर्धन विकासासाठी शासनाकडून आलेल्या निधी वापरून विकासकामे होत असतील तर कागदी घोडे नाचवून खोट्या निनावी तक्रारी दाखल करून विकासकामात खोडा घालणारी हेरिटेज कमिटी कोल्हापूरच्यादृष्टीने बिनकामाची आहे. अशा बिनकामी हेरिटेज कमिटीने जनतेपुढे शालिनी स्टुडिओ संदर्भात जाहीर खुलासा करावा.
      कोल्हापूर जिल्हा शहर नागरी कृती समितीच्यावतीने अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, अजित सासने, चंद्रकांत सुर्यवंशी, विनोद डुणुंग, लहुजी शिंदे, राजेश वरक, शंकर शेळके, पंपू सुर्वे व प्रमोद पुंगावकर यांनी मागणी केली आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!