कोल्हापूरातील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करणार: पालकमंत्री सतेज पाटील

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     ‘सर्वांना घरे’ देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर शहरातील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करण्यात येणार असून झोपडपट्टयांच्या पुनर्वसनाचा एकत्रित आराखडा लवकरात लवकर सादर करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
      शहरातील झोपडपट्टीधारकांना सातबारा देणे, झोपडपट्टीधारकांना पक्की घरे बांधून देण्याविषयी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, तहसीलदार सुनीता नेर्लीकर, महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत तसेच बांधकाम, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
      यावेळी कोल्हापूरातील राजेंद्रनगर, कसबा बावड्यातील मातंग वसाहत, संकपाळनगर, दत्त मंदिर जवळील झोपडपट्टी, शिये पाणंद उलपे माळ, शुगर पाणंद (गोळीबार मैदान) तसेच शहरातील इतर ठिकाणच्या झोपडपट्टयांचे प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषाप्रमाणे पुनर्वसन करण्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी चर्चा केली. शहरातील सामान्य माणसांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेतून पक्की घरे देण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील झोपडपट्टयांचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे, यासाठी लागू नियमांमध्ये शिथिलता मिळण्याच्या दृष्टीने नगरविकास मंत्री व नगररचना विभागाच्या संचालकांसोबत बैठक घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शहरातील झोपडपट्टी धारकांना ‘हक्काचे घर’ बांधून देण्याच्या दृष्टीने पुररेषा व अन्य बाबींचा विचार करुन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुषंगाने विविध विषयांवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी अधिकारी व असोसिएशनच्या सदस्यांसोबत चर्चा केली.
      परिख पूलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होते. या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गतीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. यावेळी ते म्हणाले, परिख पुलाच्या ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी’च्या अनुषंगाने सांडपाणी व्यवस्थापन व पावसाच्या पाण्याचा निचरा होवून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर यांच्या तांत्रिक सल्ल्याने हा प्रश्न सोडवावा. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
       महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन, परिख पूलाशी संबंधित आवश्यक बाबींची  माहिती दिली.
       असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासह समिती सदस्यांनी परिख पूल सद्यस्थिती, आवश्यक बदल व अन्य अनुषंगिक बाबींची माहिती दिली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!