दिव्यांगांच्या प्रश्नांची सोडवणुक करणार: पालकमंत्री सतेज पाटील

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
     दिव्यांगांनी आपली नैसर्गिक क्षमता वेळोवेळी सिध्द केली आहे. दिव्यांग बांधव हे मानव समुहातील महत्वाचा घटक आहेत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
       जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे महासैनिक दरबार हॉल येथे दिव्यांग रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, समाज कल्याण सभापती (जि.प.) श्रीमती कोमल मिसाळ, शिक्षण व अर्थ समिती सभापती श्रीमती रसिका पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे आदी उपस्थित होते.
      पालकमंत्री पुढे म्हणाले, दिव्यांगांसाठी शासनाने शासकीय नोकरीत ३ टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. दिव्यांगांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शहरात लवकरच स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभे करण्यात येईल तसेच ४५हजार दिव्यांगांना डीबीटीच्या माध्यमातून ५०० रू. देण्याची भूमिका घेण्यात आली असून ते पैसे लवकर वितरीत केले जातील, त्याचबरोबर जिल्ह्यातील दिव्यांगांना पात्रतेनुसार डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून, कोणताही दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित राहू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी सक्त सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
      दिव्यांगांमध्ये नवनिर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. त्यांनी आपली ही क्षमता वेळोवेळी सिध्द केली आहे. समाजाने त्यांना मूळ प्रवाहात सामावून घ्यावे तसेच जिल्ह्यातील उद्योजकांनी मानवी भावनेतून दिव्यांगांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केले.
      या रोजगार मेळाव्यातून दिव्यांगांना रोजगार मिळण्यास मदत होईल, असा आशावाद संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केला. याप्रसंगी तीन दिव्यांगांना प्रतिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते कुबडी वाटप करण्यात आले.
      यावेळी उद्योजकांच्यावतीने अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार दीपक घाटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!