एकजुटीने कोरोना विरुध्दची लढाई जिंकूया: पालकमंत्री सतेज पाटील


कोल्हापूर • प्रतिनिधी
      गट-तट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकी म्हणून कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे. या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोल्हापूरने आजपर्यंत अशा अनेक लढाया खंबीरपणे लढलेल्या आहेत आणि जिंकल्या आहेत. एकजुटीने कोरोना विरुध्दची लढाई आपण जिंकूया, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
      कोरोना दुसरी लाट आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सद्यस्थिती या विषयावर  फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधला. लसीकरण, रेमडीसीवर उपलब्धता, कोल्हापूरचा मृत्यू दर, बेडची उपलब्धता, ऑक्सीजन उपलब्धता, टेस्टिंग, याबाबत त्यांनी आकडेवारीसह सविस्तर मुद्दे मांडले.
       यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या या लाटेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासमोर आहे तो म्हणजे लसीकरणाचा. आपण सर्वजण लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करायचा प्रयत्न करतो पण ही नोंदणी फुल झालेली असते, एखाद्या आरोग्य केंद्रावर लस घ्यायला गेलो त्या ठिकाणी लस संपलेली असते या सर्व गोष्टी आपल्या मनात आहेत हे मी जाणतो. पण यातील वस्तुस्थिती म्हणजे कोणत्या राज्याला किती लस पुरवठा करायचा याची सर्व नियंत्रण हे केंद्र शासनाच्यावतीने केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करून दहा लाखांहून अधिक नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण केलेले आहे. लसीकरणाचे हे प्रमाण म्हणजे एकूण पात्र लोकसंख्येच्या ६२ टक्के आहे. या लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात सर्वात अव्वल म्हणजेच पहिल्या क्रमांकावर आहे.
      या टप्प्यावर ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांना प्राधान्याने हा दुसरा डोस देण्याची नियोजन केलेले आहे. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लस घेणे सोयीचे व्हावे यासाठी लसीकरण केंद्रावर त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असावी अशा सूचनादेखील आहे. उरलेल्या सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच.
     कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, नर्सेस, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, सुट्टी न घेता रात्रं दिवस काम करत आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे. या सर्वांचे मनोधैर्य कमी होऊ नये याची काळजी आपण सर्व जण घेऊया, अशी मी आपल्याला विनंती करतो. कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून या लढाईत रात्रंदिवस झोकून देऊन आतापर्यंत मी काम करत आलो आहे. यापुढेही असेच काम करत राहणार असून कोल्हापूरकरांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. कोल्‍हापूरच्या जनतेनेही यासाठी सहकार्य करावे.
———————————————– ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *