बीजीएम आणि सम्राटनगर स्पोर्टसची विजयी सलामी

Spread the love

• प्रॅक्टीस क्लब आणि खंडोबा (ब) पराभूत
कोल्हापूर • प्रतिनिधी
      केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात बीजीएम स्पोर्टसने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर २-१ गोलने तर सम्राटनगर स्पोर्टसने खंडोबा तालीम मंडळ (ब) वर २-० गोलने मात करून विजयी सलामी दिली. या विजयामुळे बीजीएम आणि सम्राटनगर स्पोर्टसने प्रत्येकी ३ गुणांची कमाई करत गुणतक्त्यात खाते उघडले.
       फुटबॉलशौकिनांना गेले कित्येक दिवस वेध लागून राहिलेल्या फुटबॉल हंगामाचा “किक ऑफ” मंगळवारी झाला. केएसएचे पेट्रन इन चिफ श्रीमंत शाहू महाराज छत्रपती  तसेच केएसएचे अध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचा शुभारंभ केला. याप्रसंगी केएसएच्या पेट्रन मेंबर सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केएसएचे पदाधिकारी माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, प्रा.अमर सासने, संभाजीराव मांगोरे-पाटील, विश्वंभर मालेकर, मनोज जाधव, नितीन जाधव, बाळकृष्ण पोरे, दीपक राऊत, दीपक घोडके उपस्थित होते.
           बीजीएमचा प्रॅक्टीसला ‘दे धक्का’…..
     छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रात अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात बीजीएमने बलाढ्य प्रॅक्टीस क्लबला पराभवाचा धक्का दिला.
      सुरूवातीपासूनच बीजीएमने आक्रमक चढाईचे धोरण अवलंबून खोलवर चाली रचल्या. प्रॅक्टीसनेही तेवढ्याच ताकदीने चाली रचत प्रत्युत्तर दिले. एका चढाईत सचिन गायकवाडने दिलेल्या पासवर वैभव राऊतने गोल नोंदवला आणि बीजीएमला ३४व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फारकाळ टिकली नाही. त्यानंतर प्रॅक्टीसच्या कैलास पाटीलने गोल करून ३८व्या मिनिटास सामना १-१ असा बरोबरीत आणला. लगेचच पूर्वार्धातील जादा वेळेत केवल कांबळेने गोल करत पुन्हा बीजीएमला २-१ ने आघाडीवर नेले.
      पूर्वार्धात असलेली चुरस उत्तरार्धातही राहिली. दोन्ही संघांनी परस्परांचे गोलक्षेत्र भेदण्याचा प्रयत्न केला. प्रॅक्टीसच्या ओंकार मोरेने गोलची परतफेड करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. त्याच्यासह कपील शिंदे, कैलास पाटील, सागर चिले, अनिकेत जोशी यांनी वेगवान चढाया केल्या पण त्या वाया गेल्या. बीजीएमकडून वैभव राऊत, केवल कांबळे, अभिजीत साळोखे, सचिन गायकवाड यांनी संघाची आघाडी वाढवण्यासाठी खोलवर चाली रचल्या पण त्यांना यश आले नाही. अखेर पूर्णवेळेत २-१ ची आघाडी राखत बीजीएमने विजयावर शिक्कामोर्तब करून ३ गुणांसह खाते खोलले.
       दरम्यान, महापौर चषक स्पर्धेचा अंतिम सामना १३ फेब्रुवारीला झाला. प्रॅक्टीस क्लब आणि दिलबहार यांच्यात झालेल्या या सामन्यात दिलबहारने प्रॅक्टीस क्लबला टायब्रेकरवर नमविले. काही दिवसांपूर्वीच झालेल्या या सामन्यातील पराभवानंतर आजपासून सुरू झालेल्या केएसए चषक साखळी स्पर्धेतील पहिल्याच लढतीत बलाढ्य प्रॅक्टीसला पराभव पत्करावा लागल्याने गुणतक्त्यात शून्य गुणांची नोंद झाली आहे. आजच्या सामन्यात प्रॅक्टीस क्लब पराभूत झाल्याने काही दिवसांपूर्वीच झालेल्या सामन्याची चर्चा फुटबॉलप्रेमी करत आहेत.  
                सम्राटनगरची विजयी सलामी…..
      तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात सम्राटनगरने खंडोबा (ब) वर २-० गोलने मात करून विजयी सलामी दिली. त्यांच्या रजत जाधवने पूर्वार्धात ३८व्या मिनिटास गोल केला. त्यानंतर उत्तरार्धात रोहित भोसलेने ५०व्या मिनिटास गोल नोंदवून संघाची आघाडी वाढवली. पूर्णवेळेत खंडोबा (ब) ला गोलची परतफेड करता आली नाही. अखेर २-० ने सामना जिंकून सम्राटनगरने पहिल्याच लढतीत ३ गुण मिळवले. 
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!