‘भारतीय कंपनी सचिव संस्थान’समवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      भारतीय कंपनी सचिव संस्थान (आयसीएसआय, नवी दिल्ली) यांचा शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला सामंजस्य करार अत्यंत दिशादर्शक असा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन राजेश तरपरा यांनी आज येथे काढले.
      शिवाजी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील भारतीय कंपनी सचिव संस्थान यांच्या दरम्यान सहकार्यवृद्धीच्या अनुषंगाने आज सामंजस्य करार करण्यात आला. ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र स्वरुपात करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राजेश तरपरा ऑनलाईन सहभागी होऊन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.
       श्री. तरपरा म्हणाले, कंपनी सचिव पदासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्रदान करणारी आयसीएसआय ही एकमेव संस्था आहे. केंद्र सरकारचे ‘कुशल भारत’ हे घोषवाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यासाठी संस्था अधिकाधिक प्रशिक्षण कार्यक्रम व शैक्षणिक उपक्रम घेते आहे. शिवाजी विद्यापीठ आणि आयसीएसआय या दोन्ही संस्था आपापल्या क्षेत्रात प्रस्थापित आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ परस्परांबरोबरच विद्यार्थ्यांनाही होईल. त्याचप्रमाणे विद्यापीठाने सेक्शन-८ कंपनी स्थापन केली असल्याचाही या कामी मोठा फायदा होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
       यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेले संस्थेच्या पश्चिम विभागीय प्रादेशिक मंडळाचे सदस्य पवन चांडक म्हणाले, आयसीएसआयचे देशभरात व्यापक जाळे आहे. १६ आयआयएम संस्थांसह विविध मान्यवर विद्यापीठांशी संस्थेने ७५ सामंजस्य करार केले आहेत. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या रुपाने एका दमदार साथीदाराचा समावेश झाल्याचा आनंद वाटतो. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात कंपनी सचिव पदाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांत व्यापक जाणीवजागृती करण्यासाठी संस्था सर्वोतोपरी प्रयत्नशील राहील.
       अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कंपनी सचिव या क्षेत्रातील संधींविषयी अद्याप शहरी भागाखेरीजचे बहुसंख्य विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. ग्रामीण, डोंगरी, दुष्काळी आदी दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना कंपनी सचिव क्षेत्रातील करिअर संधींची माहिती देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण, जागृती उपक्रम राबविण्याची गरज आहे. आंतरविद्याशाखीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने उपयुक्त असे उपक्रम राबविले जावेत. या सामंजस्य कराराअंतर्गत वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे विस्तृत नियोजन करावे आणि त्यानुसार वाटचाल करावी, तेव्हाच खऱ्या अर्थाने करार यशस्वी होईल.
       याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह आयसीएसआय कोल्हापूर शाखेच्या चेअरपर्सन ऐश्वर्या तोरस्कर, व्हाईस चेअरमन ज्योतिबा गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.
       शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयकडून पवन चांडक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. मान्यवरांच्या उपस्थितीत कराराच्या नस्तींचे हस्तांतर करण्यात आले.
      सुरवातीला वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला तर डॉ. केदार मारुलकर यांनी आभार मानले. यावेळी आयसीएसआयचे अमित पसारे आणि अमित पाटील उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!