कोल्हापूर • प्रतिनिधी
परवाना विभागामार्फत शहरातील विनापरवाना व्यवसायिक, थकबाकीदार परवानाधारक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील तीन विनापरवाना यात्रीनिवास व एक दुकान सील करण्यात आले.
मंगळवारी (दि.९) ताराबाई रोड, महाद्वार रोड या ठिकाणी असणारे कपिलेश्वर यात्रीनिवास, शिवम यात्रीनिवास व अंबाबाई यात्रीनिवास असे तीन विनापरवाना यात्रीनिवास सील करण्यात आले. तसेच मार्केटयार्ड समोरील सहारा बॅटरी हे दुकान विनापरवाना व्यवसाय करत असल्याने सील करण्यात आलेे. त्याचबरोबर परवाना नुतनीकरण न केलेले व्यवसायिक ठिकाणी तीस व्यवसायिकांकडून थकबाकी वसूल करण्यात आली.
सदरची कारवाई उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परवाना अधिक्षक राम काटकर, परवाना निरीक्षक संजय अतिग्रे, मंदार कुलकर्णी, रवि पोवार व विजय वाघेला, यांनी केली.
यापुढेही सदरची कारवाई सुरु राहणार असून संबंधित व्यवसायिकांनी त्वरीत परवाना विभाग, शिवाजी मार्केट याठिकाणी संपर्क साधून आपला परवाना नुतनीकरण करुन घ्यावा. तसेच थकबाकी व नवीन परवानेधारक यांनी आपला परवाना काढून घ्यावा अन्यथा कारवाई केली जाईल, असे आवाहन परवाना विभागामार्फत करण्यात आले आहे.