‘वुमन्स डॉक्टर विंग आयएमए ईव्ह कॉन’ ही राज्यस्तरीय दोन दिवसीय वैद्यकीय परिषद


 
• कोल्हापुरात शनिवारी व रविवारी परिषद
  कोल्हापूर • प्रतिनिधी
      वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला बरं करणे हे मोठे आव्हान असते. या क्षेत्रामध्ये टिकण्यासाठी मानसिक धैर्य व चिकाटीची गरज असते. ही चिकाटी आणि काम करण्याची क्षमता महिलांकडे अधिक प्रमाणात आहे. किचकट व वेळखाऊ शस्त्रक्रिया असो किंवा वैद्यकीय क्षेत्रात होणारे रोज नवनवीन संशोधन असोत, उच्चशिक्षीत महिला डॉक्टरांनी यात प्राविण्य मिळवत हे आव्हान स्विकारले आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर यांनी ‘वुमन्स डॉक्टर विंग’ ही संकल्पना आणली. या विंगची ११ वी राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद कोल्हापूर येथे होणार आहे.”वुमन टुडे अँड टूमारो” अशी संकल्पना या परिषदेची असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वुमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्षा तसेच कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा व परिषदेच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      डॉ. जाधव म्हणाल्या की, ” स्त्रियांचे अनेक आजार असतात. ज्या ते उघडपणे सांगू शकत नाहीत. पण डॉक्टर जर एखादी स्त्री असेल तर त्या खुलेपणाने बोलू शकतात. आयएमएने  स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता महिला डॉक्टर्सना नेहमीच प्राधान्य दिले आहे. ही महिला डॉक्टरची मजबूत टीम आणि त्यातील एकएक स्त्री रोग तज्ञ असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातून स्त्रियांच्या आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
       परिषदेचे उद्घाटन आयएमएचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते १६ ऑक्टोबर रोजी शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल सयाजी येथे होणार आहे. त्यांनतर डॉ.रवी वानखेडेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होईल. दोन दिवसीय या वैद्यकीय परिषदेत महिलांना फायदेशीर अशा कायदेविषयक, तंत्रज्ञान, प्रबोधनात्मक विषयांवर चर्चासत्रे  होणार आहेत, अशी माहिती परिषदेचे संघटक डॉ.अशोक जाधव यांनी दिली.
     तसेच  देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘नारीशक्ती आणि देशभक्ती’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वुमन्स डॉक्टर विंगच्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. नीता नरके यांनी सांगितले.
     यावेळी परिषदेच्या संघटक सचिव डॉ. गीता पिल्लई, डॉ. विद्युत शहा, सहसचिव डॉ. ए. बी. पाटील, डॉ.उन्नती सबनीस, डॉ. अरुण धुमाळे, डॉ.राजेंद्र वायचळ, डॉ.देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *