शरद पवार यांच्या २२ रोजीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून मैदानाच्या पाहणीसह तयारीचा आढावा
  कोल्हापूर • प्रतिनिधी
      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरद पवार २२ जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.  तयारीचा भाग म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी व  अधिकाऱ्यांच्या बैठक, पोलीस ग्राउंड मैदानाच्या पाहणीसह तयारीचा आढावा घेतला.
        शुक्रवार दि. २२ जानेवारी रोजी शरद पवार यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारलेल्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्याचा दहा कोटी रुपये खर्चाच्या बांधकामाचा कोनशिला समारंभ व आरोग्य विभागाच्या ३९ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा असे कार्यक्रम आहेत. या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत. तसेच पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच  जिल्ह्यातील खासदार, आमदार व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
     मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी  कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला व सूचना दिल्या. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी पोलीस ग्राउंडवर येथे जाऊन सभामंडप व्यवस्था, बैठक व्यवस्था, पार्किंग, पाणीपुरवठा अशा सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
      यावेळी  जि.प. अध्यक्ष बजरंग  पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम सभापती  हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रविण यादव,  महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदमाराणी  पाटील, राजेश पाटील,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, अरूण जाधव, प्रियदर्शिनी मोरे, कार्यकारी अभियंता  व्ही.आर. कांडगावे उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *