पहिल्या माळेला श्री अंबाबाईची ब्रम्हाणी रूपात पूजा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शारदीय नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ झाला. आश्विन शुद्ध प्रतिपदा तिथीला अर्थात नवरात्रातील पहिल्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची पूजा ब्रम्हाणी रूपात बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक चेतन चौधरी व लाभेश मुनिश्वर यांनी बांधली. नवरात्रात देवीची विविध रूपात विशेष अलंकार व सालंकृत पूजा बांधण्यात येते. ही पूजा पाहण्यासाठी व देवीचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रौत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
     दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे आज घटस्थापनेच्या दिवशी उघडण्यात आली. मंदिरे खुली करण्यात आल्यामुळे भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता आले. कोरोना संबंधित शासकीय नियमानुसार भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करून सोडले जात असल्याने भाविकांनीही बुकींगला प्रतिसाद दिला. अंबाबाई मंदिराच्या पश्चिमेकडील द्वारातून म्हणजेच महाद्वारातून भाविकांना देवीचे मुखदर्शन घेता येत असल्याने तेथून अनेकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
     साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवास धार्मिक  वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता मंदिर उघडल्यावर नित्यनियमाने देवीची पूजा झाली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना आणि पूजा विधी झाले. धार्मिक व मंगलमय वातावरणात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला.
     नवरात्रौत्सव असल्याने मंदिरास रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे. मंदिराच्या आतील भागातही विद्युत रोषणाई केली आहे. तसेच गाभारा आणि मंडपात पाने, फुले व फळांनी सुशोभित आणि आकर्षक सजावट केली आहे. नवरात्रौत्सव असल्याने पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
          अंबाबाईची ब्रम्हाणी रूपात पूजा…… 
    ब्रह्माणी मातृका ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वाराही च इंद्राणी चामुडा: सप्तमातराः मातृका देवता या जल मातृका, स्थल मातृका इत्यादी प्रकारच्या आहेत. या मातृकांची विवाहादी मंगल कार्यामध्ये समूहामध्ये पूजन केले जाते. यांना सप्तमातृका म्हणतात.
     या विविध देवतांच्या शक्ती रूपी तत्व देवता अहित. याचे वर्णन सप्तशती ग्रंथामध्ये आहे. असुरांच्या वधावेळी विविध देवतांनी आपापली शक्ती वापरून या देवतांना निर्माण केले. ज्या देवाचे जे रूप आहे भूषण, वाहन, शस्त्रे, अलंकार आहेत, तशाच रूपामध्ये फक्त स्त्री रूपात, देवता असुरांशी युदध करण्यासाठी आल्या.
     आज प्रथम मातृका ब्रह्माणी | ब्राह्मी या रूपात श्री अंबाबाई –  महालक्ष्मी देवीची पूजा बांधण्यात आली आहे. ब्रम्हाणी ही ब्रम्हदेवाची शक्ती आहे. ही चार मुख असणारी व चर्तुभूज आहे, तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये अपमाळ, कमंडलू, पुस्तक, घंटा आहे. तिचे वाहन हंस आहे.
ब्राह्मी स्वर्ण समाध्येया मृगचर्म विभूषीता, अक्षमालाभये दण्डकुण्डिक दधतो करे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!