राजकोट येथील विशेष कार्यक्रमास युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार

Spread the love

• राजर्षी शाहू छत्रपती महाराज स्मृती शताब्दीनिमित्त कार्यक्रम
कोल्हापूर • प्रतिनिधी
       ६ मे २०२२ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची स्मृती शताब्दी आहे. यानिमित्त महाराजांच्या कार्यास मानवंदना देण्यासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचाच भाग म्हणून राजर्षी शाहू छत्रपती महाराज ज्याठिकाणी शिकले त्या गुजरातमधील राजकुमार कॉलेज, राजकोट तसेच नीलमबाग पॅलेस, भावनगर (गुजरात) येथेही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३ व ४ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत. 
       याबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, राजर्षी शाहू छत्रपती महाराज शिकले त्या गुजरातमधील राजकुमार कॉलेज, राजकोट येथे मी याबद्दलची माहिती देणारा पत्रव्यवहार केला होता. राजर्षी शाहू छत्रपती महाराज १८८६ ते १८८९ या काळात राजकुमार कॉलेज येथे शिक्षणास होते. माझ्या पत्रास उत्तर देत असतानाच कॉलेज प्रशासनाने महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे कळवीत, या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केले आहे. या निमंत्रणास प्रतिसाद देत, छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी मी मंगळवारी (दि.३) गुजरात राज्यातील राजकुमार कॉलेज, राजकोट येथे उपस्थित राहणार आहे.
       शाहू महाराज राजकुमार कॉलेज येथे शिकत असतानाच त्यांचे सहाध्यायी असलेले भावनगरचे महाराज भावसिंहजी यांच्याशी शाहू महाराजांची चांगली मैत्री झाली. दोघांनीही ही मैत्री आयुष्यभर जपली. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरातील राजमार्गाला “भावसिंहजी रोड” असे नाव दिले, तर भावसिंहजी महाराजांनी देखील आपल्या महूआ येथील राजवाड्यास शाहू पॅलेस असे नाव दिले होते. आजही छत्रपती घराण्याचे भावनगर राजघराण्याशी आपुलकीचे संबंध आहेत. याबद्दल भावनगर राजघराण्याशी देखील मी पत्रव्यवहार केला असता, त्यांनीदेखील शाहू महाराजांना आदरांजली देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून बुधवारी (दि.४) नीलमबाग पॅलेस, भावनगर ( गुजरात ) येथे होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.
      राजकुमार कॉलेज येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमास कॉलेजचे प्रमुख विश्वस्त ठाकूर साहेब जितेंद्रसिंह, मुळी यांचेसह कॉलेज प्रशासनाचे विश्वस्त व व्यवस्थापकीय मंडळ उपस्थित राहणार आहे. तर भावनगर येथील राजवाड्यात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास भावनगरचे महाराज विजयराज सिंह गोहिल, युवराज जयवीरराज सिंह गोहिल व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!