युवराज संभाजीराजे यांचे स्वागत भव्य दिव्य करण्यात येणार: सकल मराठा समाज

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       मुंबई येथील उपोषणानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती प्रथमच गुरूवारी (दि. १०) सायंकाळी चार वाजता कोल्हापूरात येत आहेत. त्यांचे स्वागत कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे भव्य दिव्य प्रमाणात करण्यात येणार आहे. यातून छत्रपती घराण्याविषयी असणारी कृतज्ञता कोल्हापूर व्यक्त करणार आहेत. यासाठी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
      मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई येथे आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता. छत्रपती घराण्याच्या उज्ज्वल परंपरेनुसार या कठीण काळातही युवराज संभाजीराजे छत्रपती मोठ्या धैर्याने, आत्मविश्वासपुर्ण आणि संयमाने परिस्थितीला सामोरे गेले.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने; समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सात प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता.
       सरकारने उपोषणाची दखल घेऊन, समाजाच्या सातही मागण्या तत्काळ सोडवण्याचे लेखी पत्र दिले. हा समाजाच्या दृष्टीने मोठा विजय आहे. यामुळे समाजातील अनेक घटकांना मोठा लाभ मिळणार आहे.
       मुंबई येथील उपोषणानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती प्रथमच गुरूवारी (दि. १०) कोल्हापूरात येत आहेत. त्यांचे स्वागत कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे भव्य दिव्य प्रमाणात करण्यात येणार आहे.
        स्वागत मिरवणूक मार्ग पुढीलप्रमाणे-
    दि. १० रोजी दुपारी ४:०० वाजता रुईकर काॅलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. त्यानंतर दुपारी ४:०७ वाजता करवीर संस्थापिका रणरागिणी महाराणी ताराबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून
सायंकाळी ४:२० वाजता व्हिनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, सायंकाळी ४:३० वाजता ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सायंकाळी ४:३७ वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन महाराजांना अभिवादन व नर्सरी बागेतील शिवछत्रपती व रणरागिणी ताराबाई साहेबांचे दर्शन घेऊन
सायंकाळी ४:४५ वाजता छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सायंकाळी ४:५५ वाजता बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, सायंकाळी ५:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व मुख्य मिरवणूकीला प्रारंभ होईल.
      यामध्ये सुरवातीला हत्तीवर स्वराज्याचा जरीपटका असलेला मावळा, त्यानंतर अश्व व त्यावर पारंपरीक वेशातील मावळे व महिला आरूढ होणार आहेत.  कोल्हापूरातील वाद्यपथके, मर्दानी खेळ खेळणारे आखाडे, धनगरी ढोल, वारकरी पथक, लेझीम पथक, तुतारी, झांजपथक सहभागी होणार आहेत तसेच हत्तीवरुन साखर वाटण्यात येणार असून मोठ्या उत्साहामध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!