महावितरणकडून जिल्हा परिषद शाळांची वीज जोडणी तातडीने पूर्ववत

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषद शाळांची थकीत वीजबिले भरण्यासाठी १४ कोटींची तरतुद करून ते महावितरणकडे वर्ग केले आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३६९ जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा ३० लक्ष ७२ हजार रुपये थकीत वीजबिलासाठी तात्पुरत्या स्वरूपात खंडित होता.आता तो खंडित वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात येतो आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद शाळांतील डिजिटल शिक्षणाचा मार्ग सुकर होतो आहे.
       कोल्हापूर जिल्ह्यातील २३२ जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा १७ लक्ष ९३ हजार रुपये थकबाकीपोटी  तर सांगली जिल्ह्यातील १३७ जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा १२ लक्ष ७८ हजार रुपये थकबाकीपोटी तात्पुरत्या स्वरूपात खंडित होता. आता शिक्षण विभागाने वीज बिल भरणा केल्याने महावितरणने जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले आहे.
      मुख्य अभियंता परेश भागवत यांनी अधिनस्त अधीक्षक अभियंता अंकुर कावळे (कोल्हापूर) व धर्मराज पेठकर (सांगली) यांना विनाविलंब जिल्हा परिषद शाळांची वीज जोडून देण्याचे आदेश दिले आहेत.
       जिल्हा परिषद शाळांची वीज खंडित झाल्याने मुलांना होणारा उकाड्याचा त्रास, संगणक, स्मार्ट टीव्हीसारखी उपकरणे असूनही विजेअभावी बंद असे विविध प्रश्न ऐरणीवर आले होते. शिक्षण विभाग व महावितरणच्या पूरक प्रयत्नांमुळे आता  या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!