•जिल्हा परिषदेची ‘ हायटेक ‘ रुग्णसेवा

४० लाखांची अत्याधुनिक आरोग्य बस दाखल


कोल्हापूर • (जिमाका)
     राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, भुदरगड व चंदगड तालुका कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा परिषदेला सुमारे ४० लाख रुपये किंमतीची अत्याधुनिक ‘मोबाईल मेडिकल युनिट बस ‘ राज्य स्तरावरुन प्राप्त झाली असल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेची रूग्णसेवा आता खऱ्या अर्थाने ‘हायटेक ‘ झाली आहे .या आरोग्य बस सेवेचा लोकार्पण सोहळा जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते गुरूवारी पार पडला .
       या बससेवेमुळे दुर्गम भागातील लोकांना स्थानिक स्तरावर आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने माता व बाल मृत्युदर कमी होण्यास मदत होणार असून गरोदर मातांना आवश्यक उपचार उपलब्ध झाल्यामुळे सुरक्षित प्रसुतीसाठी मदत होणार आहे. माता बाल संगोपन कार्यक्रम व लसीकरण सेवा वेळेत उपलब्ध होणार आहेत. या मोबाईल युनिटच्या माध्यमातून जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल अशी भावना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
        या रुग्णसेवेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष श्री. पाटील यांनी केले तर मोबाईल मेडीकल युनिटची सुविधा ज्या दुर्गम भागात उपलब्ध नाही त्याठिकाणी ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी दिली.
     या अत्याधुनिक बसद्वारे गंभीर आजारी, व्याधीग्रस्त रुग्ण तसेच दुर्गम भागातील लोकांना बाहय रुग्णसेवा, थुंकी ,कोवीड संशयितांची रॅपीड ॲन्टीजन टेस्ट तपासणी, रक्त,लघवी तपासणी, दंत चिकित्सा, एक्सरे अहवाल तपासणी, वेळ प्रसंगी दुर्गम भागात गरोदर मातांची प्रसुतीची सुविधाही या मोबाईल मेडिकल युनिटमध्ये असल्याने ही रुग्णसेवा ‘ हायटेक ‘ झाली आहे.
     या कार्यक्रमासाठी जि. प .सदस्य राजवर्धन निबांळकर, प्रकाश टोणपे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, निवासी वैदयकीय अधिकारी (बाहयसंपर्क) डॉ. हर्षला वेदक, एन. एच. एम. परिमंडळ व्यवस्थापक श्रीमती आशा कुडचे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. स्मिता खंदारे आदी उपस्थित होते. शेवटी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *